प्रल्‍हाद जाधव

प्रल्‍हाद जाधव

Thursday, October 7, 2010

'आनंद नक्षत्र' --- प्रल्हाद जाधव

आज, उद्या आणि परवाही...

    आज दिवसभर मी कुणावरही चिडणार नाही.  राग आला तर मनातल्या मनात एक ते दहा अंक मोजीन आणि माझा राग नियंत्रणात ठेवीन. माझ्यावर जर कोणी रागावलं तर ते मला आवडत नाही मग मला दुसऱ्यावर रागावण्याचा काय अधिकार आहे ?
    आज दिवसभरात मी एकदाही खोटं बोलणार नाही.  खोटं बोलायचा विचार मनात आला तर मी त्याचा तटस्थपणे विचार करीन आणि त्याला परतवून लावीन.  माझ्याशी कोणी खोटं बोललेलं मला चालत नाही मग मला दुसऱ्याशी खोटं बोलण्याचा काय अधिकार आहे ?
    आज मी कुणाचीही फसवणूक करणार नाही.  फसवणुकीचा विचार माझ्या मनात आलाच तर मी त्याच्याकडं दुर्लक्ष करीन आणि मग काही क्षणांनी तो विचार आपोआप नाहीसा होईल.  मला कोणी फसवलेलं आवडत नाही मग  दुसऱ्याची फसवणूक करण्याचा मला काय अधिकार आहे ? 
    आज मी प्रत्येकाचं स्वागत हसून करीन.  शत्रू जरी समोर आला तरी हसून त्याचं स्वागत करण्याचा मी निर्धार केला आहे. त्याच्या तप्त वैरभावनेवर मी माझ्या स्मिताचं चांदणं शिंपडीन आणि मग आमच्यातील नव्या नाते संबंधाचं एखादं दार किलकिलं होऊ शकेल...
    आज मी अगदी मनापासून काम करीन.  काम टाळण्याची कोणतीही सबब मनात आली तरी ती बाजूला करून कार्यक्षमतेच्या नीतळ आरशात मी माझं प्रतिबिंब न्याहाळीन! मला जो पगार मिळतो तो जनतेच्या पैशातून मिळतो त्यामुळे माझ्या पगारापेक्षा जास्त मूल्यांचं काम करण्याचा मी प्रयत्न करीन.  शिवाय आज मी जे काम करणार आहे ते इतकं उत्तम करीन की ते माझं जणूकाही चरित्र ठरेल !
    आज मी कोणत्याही प्रकारच्या कुविचारांपासून दूर राहीन.  काम, क्रोध, लोभ, मद, मत्सर, अहंकार या साऱ्याच शत्रूंपासून दूर राहीन. कारण मला मिळालेल्या सुंदर शरीराचा आणि विचारशक्तीचा मला सकारात्मक वापर करून घ्यायचा आहे.
    आज मी सर्वांशी प्रेमाने वागेन.  प्रेमभावना माझ्या अंग प्रत्यंगातून ओथंबून वाहात आहे अशी माझी धारणा आहे,  जितकं प्रेम मी इतरांना वाटीन त्यापेक्षा किती तरी अधिक पटीनं ते  माझ्याकडे परत येईल हेही मला माहीत आहे. त्यामुळे मी सतत प्रेम भावनेनं भारलेला राहीन. 
आज मी सर्वांप्रती कृतज्ञता व्यक्त करीन.  मला इतका सुंदर अनुभव देणारं जीवन, ही सुंदर पृथ्वी आणि या अथांग विश्वाप्रती कृताज्ञता व्यक्त करीन.  स्वर्ग जर असलाच तर तो पृथ्वीवरच आहे हे मला चांगलं माहीत आहे,  त्यामुळे प्रत्येक क्षणांचा मी सोनं करण्याचा प्रयत्न करीन.
आज मी हे सगळं मनापासून ठरवत आहे आणि ते मी निर्धारानं अंमलात आणणार आहे कारण उद्या मी असेन की नाही हे मला माहीत नाही.

                                           ('आनंद नक्षत्र' या प्रल्हाद जाधव यांच्या आगामी पुस्तकातून )

No comments:

Post a Comment