प्रल्‍हाद जाधव

प्रल्‍हाद जाधव

Thursday, October 7, 2010

विठू माझा लेकुरवाळा --- प्रल्हाद जाधव

    पात्र संयोजन

1. जनाबाई आंबिले   --      60 वर्षे
2. विठोबा आंबिले      --          35 वर्षे
3. चंद्रभागा आंबिले     --    30 वर्षे
           4. डॉक्टर आय.यू.परदेशी       --     40 वर्षे
5. मेघजी गोहील       --          55 वर्षे
6. मेघा दुखंडे/धापूबाई   --          25/50 वर्षे
7. विकास पंडित      --           25 वर्षे
                     8. इन्स्पेक्टर विश्वास भोसले    --  35 वर्षे
                     9. हवालदार जयदेव कडू       --             40 वर्षे
------------------


अंक पहिला : प्रवेश पहिला

(पडदा उघडण्यापूर्वी दीड दोन मिनिटे टाळ मृदुंगांचा गजर.  त्यानंतर श्रेयनामावली ऐकू येते.  नंतर पुन्हा दहा-पंधरा सेकंदांसाठी टाळ मृदुंगाचा गजर.  तो थांबतो आणि हळूहळू पडदा उघडतो.  स्थळ: एमजे हॉस्पिटलच्या चौथ्या माळयावरील पाच नंबरचा महिलांचा वॉर्ड. प्रसुतीकक्ष. त्या प्रसुतीकक्षाचा सुरूवातीचा भाग रंगमंचावर दिसतो. बाकी संपूर्ण भाग विंगेच्या आत आहे अशी कल्पना. मागच्या मोठया खिडकीतून झाडाचे शेंडे, आकाशाचा थोडा भाग दिसतो. खालच्या ट्राफिकचे आवाज अधूनमधून ऐकू येतात. वॉर्डमध्ये दोन खाटा शेजारी-शेजारी. प्रत्येक खाटेजवळ मुलांसाठी पाळणे. नातेवाइकांना बसायला एखादे स्टूल. एक आडवे बाकडे. एका कोपऱ्यात नर्सची टेबल खुर्ची. टेबलावर फोनचे एक्स्टेन्शन. पलिकडे दोन खर्ुच्या. पडदा उघडतो. चंद्रभागा उशीला टेकून बसलेली. एक दिवसापूर्वीच तिने एका बाळाला जन्म दिला आहे. स्टुलावर तिची सासू जनाबाई बसलेल्या.)

जना : बरं वाटतंय ना आता ?
चंद्रा : हो.  थोडं गरगरल्यासारखं होतंय इतकंच !
जना भुल उतरली नाय अजून म्हणून वाटत असंल पण काळजी करू नको...परमेश्वराची कृपा असली की काही कठीण नाय.
चंद्रा  सिझेरियन म्हटल्यावर मी इतकी घाबरली होते की काही विचारू नका...
जना उशिरा बाळंतपण म्हटलं की ऑपरेशनचा धोका असतोच पण पार पडलं एकदाचं  देवाच्या कृपेनं... आणि एकदा का बाळाचं तोंड बघितलं की काय लक्षात रहातंय मग? उशी देऊ का  टेकायला आणखी एक?
चंद्रा : नको सासूबाई.
जना : माझी फार वर्षापासूनची विच्छा होती की घरात पाळणा हलावा...
चंद्रा : मग झाली ना ती पूर्ण आता?
जना :  झाली एकदाची पूर्ण... परमेश्वराचे उपकार कसे फेडावे ते कळत नाय... विठूचा  बाप असता तर  किती आनंद झाला असता त्याला, गावभर पेढे वाटले असते. बारसं असं थाटात केलं असतं की ज्याचं नाव ते ! मला तर असं वाटतंय चंद्रभागे...
चंद्रा  काय?
जना : विठूचा बापच आलाय तुझ्या पोटाला. तेच रूप, तसाच रंग...
चंद्रा : बरं बरं आता जास्त कौतुक करू नका नायतर दृष्ट लागायची बाळाला...  
जना : इतक्या वर्सांची विच्छा पूर्ण झाली, काय बोलू नी काय नको असं झालंय मला आणि लागली दृष्ट तर मी हाय की उतरायला...
चंद्रा  : (विषय बदलत) गाडी मिळाली का आईला ?
जना विठू आल्यावर समजंल आता. थांबल्या असत्या सखूबाई चार दिवस तर आनंद  वाटला असता...
चंद्रा : तुम्हाला माहिताय आमच्या गावची परिस्थिती...   एकटया आईच्या जीवावर  चाललंय सगळं... माणसं सोडाच पण घरातल्या जनावरांनासुध्दा तिचाच लळा आहे. आई दिसली नाय तर पाण्याला पण तोंड लावत  नाहीत  ती.  दोन दिवस थांबली हेच खूप झालं...
जना : खरं हाय तुझं म्हणनं, त्याना गाडीत बसवूनच विठू इकडं येणार होता...
(बाहेरून वॉर्डबॉय मेघजी सोळंकी हातात एक बादली आणि मोठया दांडीचा पोछा घेऊन येतो. बादलीत बुडवून पोछा मारू लागतो. पन्नाशी उलटलेला बेरकी वॉर्डबॉय.)
मेघजी  :  (तोंडात पानाचा तोबरा. जनाबाईंना-) पॉय वर घ्या...
जना  :  (गोंधळून) काय म्हणालास?
मेघजी  पॉय वर घ्या... पोछा मारू दे मलॉ...
जना  : असं व्हय... (पाय वर घेत) जरा सावकाश, दमानं घे बाबा... तुझी काठी लागली पाळण्याला  तर बाळ उठंल, झोपलंय आताच...
मेघजी  :  (अपमानित झाल्याप्रमाणे) टुमी मला शिकवटॉ?
जना  :  काय ?
मेघजी  : टुमी मलॉ शिकवटा?
जना  :  तुझं ते तोंड मोकळं करून ये आधी, मला काहीच कळत नाय...
मेघजी :  (खिडकीजवळ जाऊन बाहेर पिचकारी मारतो आणि परत येऊन तावातावाने) पोराच्या  पाळण्याला दांडा लागंल हे मला शिकवताय तुमी? मला अक्कल  नाय, मी गाढव हाय असं वाटलं का तुमाला?
जना   : मी कुठं तुला गाढव म्हणाले ? (चंद्रभागाला हळूच) वास काय येतोय मेल्याच्या  तोंडाला बघ... पिऊन आलाय वाटतं, शी...
मेघजी :  काय म्हणाला, पिऊन आलाय? हो पिऊन आलोय मी पण स्वत:च्या पैशानं. तुमी दिली  का आणून?
जना  :  अरे पण त्याला काय काळ वेळ?
मेघजी  :   हे स्टूल घ्या तिकडं... चाळीस वर्ष नोकरी झाली माझी पण 'घेतली' नाय असा एक दिवस गेला नाय... का ते तुमाला कळणार नाय कधी ... आता सकाळी चारचीच गोष्ट घ्या ...
जना :   काय झालं चार वाजता?
मेघजी  :  शेजारच्या चार नंबरच्या वॉर्डातली नऊ नंबरची पेशंट बाई... खैरुन्निसा इक्बाल हुसेन...
जना :  काय झालं तिला ?
मेघजी  :  काय होणार, गचकली की...
जना :  ऑं ?

महत्वाची सूचना : या नाटकाचे भाषांतर, रूपांतर किंवा त्यावर आधारित दूरदर्शन मालिका, चित्रपट, टेलिफिल्म यासारख्या अन्य माध्यमातील परिवर्तनासाठी लेखकाची परवानगी घेणे गरजेचे आहे. हे नाटक किंवा त्यातील कोणताही भाग, कोणत्याही मुद्रित वा इलेक्ट्रॉनिक्स माध्यमात वापरावयाचा असल्यास लेखकाची पूर्वपरवानगी घेण्यात यावी.
पत्ता : शासकीय वसाहत, 1/11, वांद्रे (पूर्व), मुंबई - 400051. दूरध्वनी - 26456074.

No comments:

Post a Comment