प्रल्‍हाद जाधव

प्रल्‍हाद जाधव

Thursday, October 7, 2010

झरणी

का ?

शब्‍दांची ओळख झाली
आणि मग त्‍यांचा नाद कधी सुटलाच नाही
काही लिहिलं नाही असा दिवस गेला नाही . . .

पुढे काय होईल हे माहीत नाही
ही कविता पाहा

झरणी

'अर्थ संकोचू लागला शब्‍दात निर्विवाद
आणि अक्षरांची सावली पडू लागली लांब
त्‍या सावलीखाली जमू लागली
प्रशंसेची मोकाट गुरं...
म्‍हणून तपासून आणली झरणी
तर तिच्‍यात शाईऐवजी वांझोटी आई'

ललित लेखन हा आवडता छंद.
पण कथा, कविता, कादंबरी,
नाटक, चित्रपट कथा अशी वेगवेगळी क्षेत्रं हाताळली,
केवळ हौसेपोटी कवितेनं मात्र चांगलंच छळलं.
लळापण लावला, दुःखात साथही केली,
शेवटपर्यंत (अजून) जवळ राहिली... काळजाच्‍या...
मला वेगळं अस्तित्‍वच ठेवलं नाही तिनं.

पोटापाण्‍याच्‍या व्‍यवसायात
(सरकारी नोकरी)
पुन्हा संबंध आला तो
शब्‍दांशी‍च !
बातम्‍या, लेख, स्‍तंभलेखन,
जाहिराती, जिंगल असं लिहित राहिलो.
जमेल तसं, वेडं-वाकडं-निष्‍ठेनं...
यातलं काही लेखन आपल्‍याशी
शेअर करावं म्‍हणून हा उद्योग...

'आनंद नक्षत्र' --- प्रल्हाद जाधव

आज, उद्या आणि परवाही...

    आज दिवसभर मी कुणावरही चिडणार नाही.  राग आला तर मनातल्या मनात एक ते दहा अंक मोजीन आणि माझा राग नियंत्रणात ठेवीन. माझ्यावर जर कोणी रागावलं तर ते मला आवडत नाही मग मला दुसऱ्यावर रागावण्याचा काय अधिकार आहे ?
    आज दिवसभरात मी एकदाही खोटं बोलणार नाही.  खोटं बोलायचा विचार मनात आला तर मी त्याचा तटस्थपणे विचार करीन आणि त्याला परतवून लावीन.  माझ्याशी कोणी खोटं बोललेलं मला चालत नाही मग मला दुसऱ्याशी खोटं बोलण्याचा काय अधिकार आहे ?
    आज मी कुणाचीही फसवणूक करणार नाही.  फसवणुकीचा विचार माझ्या मनात आलाच तर मी त्याच्याकडं दुर्लक्ष करीन आणि मग काही क्षणांनी तो विचार आपोआप नाहीसा होईल.  मला कोणी फसवलेलं आवडत नाही मग  दुसऱ्याची फसवणूक करण्याचा मला काय अधिकार आहे ? 
    आज मी प्रत्येकाचं स्वागत हसून करीन.  शत्रू जरी समोर आला तरी हसून त्याचं स्वागत करण्याचा मी निर्धार केला आहे. त्याच्या तप्त वैरभावनेवर मी माझ्या स्मिताचं चांदणं शिंपडीन आणि मग आमच्यातील नव्या नाते संबंधाचं एखादं दार किलकिलं होऊ शकेल...
    आज मी अगदी मनापासून काम करीन.  काम टाळण्याची कोणतीही सबब मनात आली तरी ती बाजूला करून कार्यक्षमतेच्या नीतळ आरशात मी माझं प्रतिबिंब न्याहाळीन! मला जो पगार मिळतो तो जनतेच्या पैशातून मिळतो त्यामुळे माझ्या पगारापेक्षा जास्त मूल्यांचं काम करण्याचा मी प्रयत्न करीन.  शिवाय आज मी जे काम करणार आहे ते इतकं उत्तम करीन की ते माझं जणूकाही चरित्र ठरेल !
    आज मी कोणत्याही प्रकारच्या कुविचारांपासून दूर राहीन.  काम, क्रोध, लोभ, मद, मत्सर, अहंकार या साऱ्याच शत्रूंपासून दूर राहीन. कारण मला मिळालेल्या सुंदर शरीराचा आणि विचारशक्तीचा मला सकारात्मक वापर करून घ्यायचा आहे.
    आज मी सर्वांशी प्रेमाने वागेन.  प्रेमभावना माझ्या अंग प्रत्यंगातून ओथंबून वाहात आहे अशी माझी धारणा आहे,  जितकं प्रेम मी इतरांना वाटीन त्यापेक्षा किती तरी अधिक पटीनं ते  माझ्याकडे परत येईल हेही मला माहीत आहे. त्यामुळे मी सतत प्रेम भावनेनं भारलेला राहीन. 
आज मी सर्वांप्रती कृतज्ञता व्यक्त करीन.  मला इतका सुंदर अनुभव देणारं जीवन, ही सुंदर पृथ्वी आणि या अथांग विश्वाप्रती कृताज्ञता व्यक्त करीन.  स्वर्ग जर असलाच तर तो पृथ्वीवरच आहे हे मला चांगलं माहीत आहे,  त्यामुळे प्रत्येक क्षणांचा मी सोनं करण्याचा प्रयत्न करीन.
आज मी हे सगळं मनापासून ठरवत आहे आणि ते मी निर्धारानं अंमलात आणणार आहे कारण उद्या मी असेन की नाही हे मला माहीत नाही.

                                           ('आनंद नक्षत्र' या प्रल्हाद जाधव यांच्या आगामी पुस्तकातून )

तांबट : एक आत्मशोध --- प्रल्हाद जाधव

                          ज्यानं
मला
हा
अनुभव
दिला
त्या तांबटालाच...

Bird watching is economical,
It saves going to heaven.
                                      - Emily Dikinson

तांबट : एक आत्मशोध

   तांबट पक्षी जगभर सगळीकडे  आढळून येतो. प्रांता प्रांतात त्याच्या रंगरूपात आणि नावात थोडेफार बदल होतात, पण त्याचं Coppersmith हे इंग्रजी नाव जगभर प्रचलित आहे. या पुस्तकातला तांबट Crimsonbreasted Barbet म्हणून ओळखला जातो. शास्त्रीय भाषेत बोलायचं तर तो ‘Megalaima haemacephala µÖÖ ãú»ÖÖŸÖ»ÖÖ †ÖÆêü.
पक्ष्यांसंबंधी मराठीत फार कमी लिहिलं गेलंय, मग ते शास्त्रीय असो वा ललित ! या तांबटाविषयी तर विश्वकोशातली नोंद आणि मारुती चितमप?ी यांच्या पक्षिकोशातील अल्पशी माहिती सोडल्यास फार काही हाती लागत नव्हतं.
इंटरनेटवरून माहिती मिळवण्याचा प्रयत्न केला पण तिथंही केवळ शास्त्रीय स्वरुपाची संक्षिप्त माहिती मिळत होती.  किती प्रकारचे तांबट अस्तित्वात आहेत, ते कुठं राहतात, त्यांची लांबी किती, किती अंडी घालतात, काय खातात या सारखी माहिती आणि छायाचित्रं पाहायला मिळायची. पण या माहितीविषयी खात्री वाटत नव्हती, समाधान होत नव्हतं. उपलब्ध होणारी माहिती आणि तांबटांच्या प्रत्यक्ष निरीक्षणातले माझे अनुभव यातही फरक पडत होता.
                ‘Bombay Natural History Society’चे संचालक डॉ.असद रहेमानी यांची एकदा भेट  घेतली.  त्यांनी मला त्यांच्या ग्रंथालयात नेऊन ‘Biology of Indian Barbets’ हे प्रो.एच.एस.ए. याह्या ह्यांचं पुस्तक दाखवलं. प्रो.याह्या ह्यांनी त्यांच्या पीएच.डी.साठी तांबटहा विषय निवडला होता. पण त्यांचं संशोधन Small Green Barbet अर्थात छोटया हिरव्या तांबटावर आणि Crimsonthroated Barbet अर्थात मलबारी तांबटावर आहे. ‘Crimsonbreasted Barbet’ संबंधी त्यात काही महत्त्वाच्या नोंदी आढळल्या, माहिती मिळाली पण त्यामुळं माझं समाधान होत नव्‍हतं, अनेक प्रश्‍नांची उत्‍तरं मिळत नव्‍हती. 
       कावळा का%%व का%%¾Ö करतो, चिमणी चि%%व चि%% करते त्या धर्तीवर तांबटाचा आवाज कसा असतो, असा साधा प्रश्न होता. त्याच्या आवाजाचा उच्चार मराठी विश्वकोशाटोंक... टोंक... असा दिला आहे. चितमपल्‍ली यांच्या पक्षिकोशाटोक ... टोक ... आणि टुक्... टुक्... असे दोन उच्चार दिले आहेत.  प्रो. याह्या यांनी आपल्या ग्रंथात टुक्... टुक्... असा तर डॉ.सतीश पांडे यांनी आपल्या Birds of Western Ghats या ग्रंथात पुक्... पुक्... असा उच्चार दिला आहे.
विदर्भात याच तांबटाचा आवाज पुक्... पुक्... असा येतो म्हणून त्याला तिकडे पुकपुक्या असे नाव पडले आहे.  सखा नागझिराचे लेखक प्रसिध्द पक्षिनिरीक्षक किरण पुरंदरे यांनी हा आवाज पुक्... पुक्... असा लिहावा असे चर्चेत म्हटले पण त्यांच्या कापशीची डायरी या पुस्तकात तो टक् टक् टक् असा आणि उक् उक् उक् असाही दिला आहे.
डॉ.सलीम अली यांचे Handbook of the Birds of India and Pakistan हे दहा खंडांचे संशोधन प्रसिध्द आहे.  त्यातील चौथ्या खंडात त्यांनी या तांबटाचा आवाज टुक्... टुक्... किंवा टुंक्... (Tunk) असा दिला आहे. त्यांच्याच ‘Common Birds’ या पुस्तकात मात्र याच तांबटाचा आवाज त्यांनी फक्‍त टु क् ...टु क्... टुक्... असा नमूद केला आहे.
   दुर्गा भागवतांनी नाशिकचे तत्कालीन कलेक्टर जॅक्सन यांच्या ग्रंथसंग्रहावर आधारित टोक...टोक...टोक या मथळयाचा एक लेख लिहिला आहे. (त्यांच्या भावमुद्रा या पुस्तकात हा लेख समाविष्ट आहे.)  हा आवाज अर्थातच तांबटाचा आहे पण त्यानी टोवर अनुस्वार दिलेला नाही की úचा पाय मोडलेला नाही. त्याचे काहीतरी कारण असेलच पण ते कळायला आता मार्ग नाही.  सोलापूरचे पक्षीनिरीक्षक बी.एस.कुलकर्णी यांनी आपल्या पक्षी निरीक्षण या पुस्तकात तोच आवाज ट्रवाँग ट्रवाँग असा दिला आहे. Internet वरील माहितीत बऱ्याचदा Tonk, Tonk असा शब्द आढळतो. त्याला Tonk Notes असं ही म्‍हणतात.
पक्ष्यांचे आवाज नेमके कसे ऐकू येतात आणि त्यांचे उच्चार कसे करायचे हे त्या त्या प्रांताशी आणि भाषेशी संबंधित असते, असे डॉ.असद रहेमानी यांनी सांगितले.  ते म्हणाले,  ‘‘टिटवीच्या आवाजाचा इंग्लीशमधील उच्चार आणि जपानीमधील उच्चार वेगळा राहील हे स्पष्टच आहे ’’.
(अधिक वाचनांसाठी कृपया लेखकांशी संपर्क साधावा)

आभार :
मारुती चितमपल्‍ली, दिनकर गांगल, श्रीनिवास विनायक कुळकर्णी, अशोक शहाणे, सौ. रेखा शहाणे, शिरीष वीरकर, सुरेश वाघे, सुनील कर्णिक, नीळू दामले, भारत सासणे, अनंत भावे, दिलीप चावरे, सुदेश हिंगलासपूरकर, अरुण जोशी, धनंजय गांगल, शरद चव्हाण, विजय होकर्णे, अनिल छड्डा, मनोज आचार्य, नीलिमा धोदरे.

विठू माझा लेकुरवाळा --- प्रल्हाद जाधव

    पात्र संयोजन

1. जनाबाई आंबिले   --      60 वर्षे
2. विठोबा आंबिले      --          35 वर्षे
3. चंद्रभागा आंबिले     --    30 वर्षे
           4. डॉक्टर आय.यू.परदेशी       --     40 वर्षे
5. मेघजी गोहील       --          55 वर्षे
6. मेघा दुखंडे/धापूबाई   --          25/50 वर्षे
7. विकास पंडित      --           25 वर्षे
                     8. इन्स्पेक्टर विश्वास भोसले    --  35 वर्षे
                     9. हवालदार जयदेव कडू       --             40 वर्षे
------------------


अंक पहिला : प्रवेश पहिला

(पडदा उघडण्यापूर्वी दीड दोन मिनिटे टाळ मृदुंगांचा गजर.  त्यानंतर श्रेयनामावली ऐकू येते.  नंतर पुन्हा दहा-पंधरा सेकंदांसाठी टाळ मृदुंगाचा गजर.  तो थांबतो आणि हळूहळू पडदा उघडतो.  स्थळ: एमजे हॉस्पिटलच्या चौथ्या माळयावरील पाच नंबरचा महिलांचा वॉर्ड. प्रसुतीकक्ष. त्या प्रसुतीकक्षाचा सुरूवातीचा भाग रंगमंचावर दिसतो. बाकी संपूर्ण भाग विंगेच्या आत आहे अशी कल्पना. मागच्या मोठया खिडकीतून झाडाचे शेंडे, आकाशाचा थोडा भाग दिसतो. खालच्या ट्राफिकचे आवाज अधूनमधून ऐकू येतात. वॉर्डमध्ये दोन खाटा शेजारी-शेजारी. प्रत्येक खाटेजवळ मुलांसाठी पाळणे. नातेवाइकांना बसायला एखादे स्टूल. एक आडवे बाकडे. एका कोपऱ्यात नर्सची टेबल खुर्ची. टेबलावर फोनचे एक्स्टेन्शन. पलिकडे दोन खर्ुच्या. पडदा उघडतो. चंद्रभागा उशीला टेकून बसलेली. एक दिवसापूर्वीच तिने एका बाळाला जन्म दिला आहे. स्टुलावर तिची सासू जनाबाई बसलेल्या.)

जना : बरं वाटतंय ना आता ?
चंद्रा : हो.  थोडं गरगरल्यासारखं होतंय इतकंच !
जना भुल उतरली नाय अजून म्हणून वाटत असंल पण काळजी करू नको...परमेश्वराची कृपा असली की काही कठीण नाय.
चंद्रा  सिझेरियन म्हटल्यावर मी इतकी घाबरली होते की काही विचारू नका...
जना उशिरा बाळंतपण म्हटलं की ऑपरेशनचा धोका असतोच पण पार पडलं एकदाचं  देवाच्या कृपेनं... आणि एकदा का बाळाचं तोंड बघितलं की काय लक्षात रहातंय मग? उशी देऊ का  टेकायला आणखी एक?
चंद्रा : नको सासूबाई.
जना : माझी फार वर्षापासूनची विच्छा होती की घरात पाळणा हलावा...
चंद्रा : मग झाली ना ती पूर्ण आता?
जना :  झाली एकदाची पूर्ण... परमेश्वराचे उपकार कसे फेडावे ते कळत नाय... विठूचा  बाप असता तर  किती आनंद झाला असता त्याला, गावभर पेढे वाटले असते. बारसं असं थाटात केलं असतं की ज्याचं नाव ते ! मला तर असं वाटतंय चंद्रभागे...
चंद्रा  काय?
जना : विठूचा बापच आलाय तुझ्या पोटाला. तेच रूप, तसाच रंग...
चंद्रा : बरं बरं आता जास्त कौतुक करू नका नायतर दृष्ट लागायची बाळाला...  
जना : इतक्या वर्सांची विच्छा पूर्ण झाली, काय बोलू नी काय नको असं झालंय मला आणि लागली दृष्ट तर मी हाय की उतरायला...
चंद्रा  : (विषय बदलत) गाडी मिळाली का आईला ?
जना विठू आल्यावर समजंल आता. थांबल्या असत्या सखूबाई चार दिवस तर आनंद  वाटला असता...
चंद्रा : तुम्हाला माहिताय आमच्या गावची परिस्थिती...   एकटया आईच्या जीवावर  चाललंय सगळं... माणसं सोडाच पण घरातल्या जनावरांनासुध्दा तिचाच लळा आहे. आई दिसली नाय तर पाण्याला पण तोंड लावत  नाहीत  ती.  दोन दिवस थांबली हेच खूप झालं...
जना : खरं हाय तुझं म्हणनं, त्याना गाडीत बसवूनच विठू इकडं येणार होता...
(बाहेरून वॉर्डबॉय मेघजी सोळंकी हातात एक बादली आणि मोठया दांडीचा पोछा घेऊन येतो. बादलीत बुडवून पोछा मारू लागतो. पन्नाशी उलटलेला बेरकी वॉर्डबॉय.)
मेघजी  :  (तोंडात पानाचा तोबरा. जनाबाईंना-) पॉय वर घ्या...
जना  :  (गोंधळून) काय म्हणालास?
मेघजी  पॉय वर घ्या... पोछा मारू दे मलॉ...
जना  : असं व्हय... (पाय वर घेत) जरा सावकाश, दमानं घे बाबा... तुझी काठी लागली पाळण्याला  तर बाळ उठंल, झोपलंय आताच...
मेघजी  :  (अपमानित झाल्याप्रमाणे) टुमी मला शिकवटॉ?
जना  :  काय ?
मेघजी  : टुमी मलॉ शिकवटा?
जना  :  तुझं ते तोंड मोकळं करून ये आधी, मला काहीच कळत नाय...
मेघजी :  (खिडकीजवळ जाऊन बाहेर पिचकारी मारतो आणि परत येऊन तावातावाने) पोराच्या  पाळण्याला दांडा लागंल हे मला शिकवताय तुमी? मला अक्कल  नाय, मी गाढव हाय असं वाटलं का तुमाला?
जना   : मी कुठं तुला गाढव म्हणाले ? (चंद्रभागाला हळूच) वास काय येतोय मेल्याच्या  तोंडाला बघ... पिऊन आलाय वाटतं, शी...
मेघजी :  काय म्हणाला, पिऊन आलाय? हो पिऊन आलोय मी पण स्वत:च्या पैशानं. तुमी दिली  का आणून?
जना  :  अरे पण त्याला काय काळ वेळ?
मेघजी  :   हे स्टूल घ्या तिकडं... चाळीस वर्ष नोकरी झाली माझी पण 'घेतली' नाय असा एक दिवस गेला नाय... का ते तुमाला कळणार नाय कधी ... आता सकाळी चारचीच गोष्ट घ्या ...
जना :   काय झालं चार वाजता?
मेघजी  :  शेजारच्या चार नंबरच्या वॉर्डातली नऊ नंबरची पेशंट बाई... खैरुन्निसा इक्बाल हुसेन...
जना :  काय झालं तिला ?
मेघजी  :  काय होणार, गचकली की...
जना :  ऑं ?

महत्वाची सूचना : या नाटकाचे भाषांतर, रूपांतर किंवा त्यावर आधारित दूरदर्शन मालिका, चित्रपट, टेलिफिल्म यासारख्या अन्य माध्यमातील परिवर्तनासाठी लेखकाची परवानगी घेणे गरजेचे आहे. हे नाटक किंवा त्यातील कोणताही भाग, कोणत्याही मुद्रित वा इलेक्ट्रॉनिक्स माध्यमात वापरावयाचा असल्यास लेखकाची पूर्वपरवानगी घेण्यात यावी.
पत्ता : शासकीय वसाहत, 1/11, वांद्रे (पूर्व), मुंबई - 400051. दूरध्वनी - 26456074.